Home Cities जळगाव गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘चैत्र पालवी स्वरोत्सव’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; जळगावकर रसिक मंत्रमुग्ध

गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘चैत्र पालवी स्वरोत्सव’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; जळगावकर रसिक मंत्रमुग्ध


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागतानिमित्त जळगावातील महात्मा गांधी उद्यान येथे ‘चैत्र पालवी स्वरोत्सव’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित या कार्यक्रमाला जळगावकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत संगीताच्या सुरेल मैफिलीचा मनमुराद आनंद लुटला.

कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी आणि विश्वस्त दीपक चांदोरकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच गुढीपाडव्याच्या पारंपरिक उत्साहात संगीताचा रंग भरत वातावरण भारावून गेले.

गायक वरुण नेवे आणि गायिका श्रुती जोशी यांनी सादर केलेल्या भावभक्तीपर आणि मराठी गीतांनी रसिकांची मने जिंकली. त्यांच्या सुरेल गायनामुळे संपूर्ण परिसरात एक वेगळीच सांगीतिक ऊर्जा निर्माण झाली. यासोबतच राजश्री रत्नपारखी यांनी सादर केलेल्या बासरी वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आणि कार्यक्रमाला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले.

कार्यक्रमात संवादिनीवर राजेंद्र माने आणि तबल्यावर राहुल कासार यांनी उत्कृष्ट साथसंगत देत सादरीकरणांना अधिक उठाव दिला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती झारे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन नुपूर खटावकर चांदोरकर यांनी केले.

गुढीपाडव्याच्या पावन निमित्ताने आयोजित या स्वरोत्सवामुळे जळगाव शहरात सांस्कृतिक वातावरणाची निर्मिती झाली. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला दिलेला प्रतिसाद हा आयोजकांसाठी उत्साहवर्धक ठरला.

 


Protected Content

Play sound