यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील समाजकारण, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थांनी ‘विश्व बंधुत्व दिना’च्या निमित्ताने एकत्र येऊन एक सामाजिक जाणीव निर्माण करणारे रक्तदान शिबिर आयोजित केले. या उपक्रमात शहरातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून युवकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती केली आणि प्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या रक्तदात्यांचे मनोबल वाढवले.

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल आणि प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने २३ ऑगस्ट रोजी दया लक्ष्मी नगर, भुसावळ रोड येथे हे रक्तदान शिबिर पार पडले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी यावल महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम.डी. खैरनार होते. प्रमुख पाहुणे म्हणून रेड क्रॉस सोसायटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे, शिवसेना शहर प्रमुख पंकज बारी, नानाभाई, तसेच विशेष उपस्थिती म्हणून प्रभाकर आप्पा सोनवणे आणि त्यांचे चिरंजीव संदीप भाई, अमोल भारुड आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. एम.डी. खैरनार यांनी आपल्या भाषणातून रक्तदानाचे महत्त्व उलगडून सांगितले. त्यांनी सांगितले की, “रक्तदान हे केवळ एक सामाजिक कार्य नाही, तर ते जीवनदानाचे श्रेष्ठ रूप आहे. अपघात, प्रसूती किंवा मोठ्या शस्त्रक्रियांच्या वेळी रक्ताची गरज अत्यंत महत्त्वाची असते. प्रत्येकाने दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे.” त्यांनी असेही नमूद केले की, “रक्तदात्याला तात्पुरती थकवा येऊ शकतो, पण त्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. हृदयविकार आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळण्याची शक्यता असते.”
शिवसेनेचे शहरप्रमुख पंकज बारी यांनीही यावेळी मार्गदर्शन करताना जीवनदान, नैराश्यावरील नियंत्रण, आणि मानसिक समाधान यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी तरुणांना अशा सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
या रक्तदान शिबिरात एकूण ३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले आणि समाजापुढे एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी यावल महाविद्यालय व प्रजापती ब्रह्माकुमारी संस्थेच्या वतीने प्रत्येक रक्तदात्याला एक रोप भेट देऊन स्वागत करण्यात आले. यामुळे पर्यावरणपूरक दृष्टिकोनाही अधोरेखित झाला. विशेष म्हणजे महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी देखील मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्साहाने रक्तदान केले.
या शिबिराचे आयोजन यावल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी महाविद्यालयातील एन.एस.एस. विभागप्रमुख डॉ. पी.व्ही. पावरा, प्रा. सी.टी. वसावे, प्रा. भावना बारी, प्रा. इमरान खान यांची उपस्थिती होती. तसेच, एन.एस.एस. विभागातील स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी संपूर्ण शिबिरात महत्त्वाची भूमिका बजावली.



