पोलीस दलाच्या शस्त्र प्रदर्शनाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र पोलिस स्थापना दिवस अर्थात महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्त जळगाव जिल्हा पोलीस दल, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन आणि युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जिल्हा पोलीस मुख्यालयातील स्केटिंग ग्राऊंडवर शस्त्र प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, तसेच युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया उपस्थित होते.

यावेळी डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सुरक्षित वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आणि आपल्या पालकांना त्याचे पालन करण्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन केले. अशोक नखाते यांनी विद्यार्थ्यांना “छोटे पोलीस” बनण्याचा सल्ला दिला आणि पालकांना नियमांचे पालन न केल्यास त्यांना याबाबत जाब विचारण्याचे आवाहन केले.

या प्रदर्शनाला जळगावातील विविध शाळांमधील सुमारे चार ते पाच हजार विद्यार्थी, शिक्षक, एनसीसीचे विद्यार्थी आणि जळगावकर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. शस्त्र प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी पोलीस दलाच्या कार्यप्रणाली आणि शस्त्रसज्जतेची माहिती घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली असून, पोलीस दलाबद्दल आदर वाढल्याचे दिसून आले.

Protected Content