खामगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिवजयंतीनिमित्त शासकीय तंत्रनिकेतन खामगाव येथे देशभक्ती आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मेरा भारत’ (MY Bharat) उपक्रमाअंतर्गत गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जिमखान्याच्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. संस्थेचे प्राचार्य डॉ. समीर प्रभुणे यांनी सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी श्रद्धासुमने अर्पण करून शिवजयंती साजरी केली. यावेळी प्रा. नितीन सोनी यांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि सुशासनाच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

यानंतर संस्थेच्या परिसरात पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रेच्या प्रारंभी आणि समारोपावेळी अणुविद्युत विभागातील विद्यार्थी श्री करण घाटोळ यांनी दिलेल्या जोशपूर्ण शिवगर्जनेमुळे वातावरण दणाणून गेले. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर देशभक्तीच्या जयघोषांनी भारावून गेला. प्रा. विजय आटोळे व विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्साहवर्धक घोषणांमुळे पदयात्रेला अधिक ऊर्जा प्राप्त झाली.
संपूर्ण पदयात्रा शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. जिमखाना उपाध्यक्ष प्रा. सागर जुमडे, सचिव प्रा. रंगनाथ गिऱ्हे, दिनकर सपकाळ, अजय कुंडेटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. युवकांना शिवाजी महाराजांनी दाखविलेल्या शौर्य, राष्ट्रनिष्ठा, सुशासन आणि राष्ट्रनिर्मितीच्या आदर्शांशी पुन्हा जोडणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
प्राचार्य डॉ. समीर प्रभुणे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संस्थेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक वारशाबद्दल जागरूकता आणि अभिमानाची भावना निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले. संस्थेचे जनसंपर्क अधिकारी प्रा. राजेश मंत्री यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या कार्यक्रमाची माहिती दिली.



