जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठान आणि के.सी.ई. सोसायटीच्या शालेय विभागाच्या वतीने रविवार १२ जानेवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान गीता पठण स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेमध्ये जळगाव शहरासह ग्रामीण भागातील शाळांचे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी भागवत गीतेचे विविध अध्याय सुंदर पद्धतीने वाचन केल्याचे दिसून आले.
या कार्यक्रमाचे आयोजन केसीईच्या शिक्षण शास्त्र आणि शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन स्वामीनारायण मंदिराचे महंत नयन स्वामी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य संजय भारंबे, प्राचार्य अशोक राणे, के.सी.ई. समन्वयक चंद्रकांत भंडारी, प्राचार्य संजय सुगंधी आणि मुख्याध्यापिका प्रणिती झांबरे उपस्थित होत्या.
गीतेचे पठण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ धार्मिक प्रगतीच नव्हे, तर आपली शिस्त, अभ्यासाची गोडी आणि समर्पणाची भावना देखील प्रकट केल्याचे पहायला मिळाले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून धर्म, तत्त्वज्ञान आणि संस्कृती यांच्या महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला. गीता स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.