संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिंडीत समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  विठ्ठल नामाच्या गजरामध्ये शहरातील अयोध्या नगर परिसरात संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष दिंडी व पालखी काढण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ठिकठिकाणी दिंडीचे रांगोळी काढून स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि समाज प्रबोधन किर्तन देखील उत्साहात संपन्न झाले.

 

महात्मा फुले बहुउद्देशीय समाज विकास संस्था, अयोध्या नगरतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अयोध्या नगर परिसरातील महादेव मंदिर येथे संत शिरोमणी सावता माळी यांच्या प्रतिमेचे पूजन शहराचे आ. राजूमामा भोळे व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी नगरसेवक वीरेन खडके,  रंजनाताई वानखेडे, माजी नगरसेवक प्रदीप रोटे, विजय वानखेडे उपस्थित होते. यानंतर दिंडी व पालखीला सुरुवात झाली. पालखीमध्ये कलशधारी महिला तसेच पारंपारिक वेशभूषामध्ये लहान मुलांसह स्त्री-पुरुष सहभागी झाले होते.

 

विविध भजनांच्या तालावर भाविकांनी दिंडीमध्ये टाळ मृदुंगाचा करत गजर करीत वातावरण भक्तीमय केले. दिंडी अयोध्या नगर, सद्गुरु नगर, अपना घर कॉलनी परिसरातून म्हाडा कॉलनीतील मातोश्री हाइट्स येथे संपन्न झाली. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी यशासाठी स्वतःशीच स्पर्धा करून नेहमी पुढे गेले पाहिजे. तसेच चिकाटी व जिद्दीच्या बळावर यशाच्या पायऱ्या चढ़ल्या पाहिजे असे मत आमदार राजूमामा भोळे यांनी व्यक्त केले.

 

यानंतर हभप दिलीप महाराज यांनी समाज प्रबोधन कीर्तन सादर केले. संत शिरोमणी सावता माळी यांच्या चरित्राविषयी माहिती सांगून, संतांच्या कार्याची प्रत्येकाने जाण ठेवून त्याप्रमाणे त्यांच्या उपदेशाची कृती करावी असे त्यांनी सांगितले. तसेच व्यसनांपासून दूर राहून समाज बांधिलकीसाठी समाजबांधवांनी पुढे आले पाहिजे असेही ते म्हणाले. यानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.

 

कार्यक्रमात रेड प्लस ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात २० समाज बांधवांनी रक्तदान केले. यावेळी अध्यक्ष नंदू पाटील, सचिव सुभाष माळी, उद्योजक संतोष इंगळे, रितेश माळी यांच्यासह हर्षल इंगळे, हेमंत महाजन, महेश महाजन, जयंत इंगळे, वामन महाजन,  प्रशांत महाजन, कुलदीप थोरात,  दिलीप बागुल, निलेश माळी, संकेत चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, शरद मोरे,  सचिन महाजन आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content