
जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | श्री संत ज्ञानेश्वर चौकात सुरू असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर संजीवन सोहळ्याचा दुसरा दिवस ह.भ.प. अमृत महाराज गाढे बेटावदकर यांच्या सुमधुर किर्तनाने भारून गेला. महाराजांनी ‘परमात्मा सत्य आहे’ या विषयावर अत्यंत सखोल आणि ओजस्वी भाषेत मार्गदर्शन केले.

किर्तनात बोलताना महाराज म्हणाले की, “परमात्मा हा एकच आहे आणि तोच त्रिकालाबाधित सत्य आहे, कारण तो सुरुवात, मध्य आणि अंत या सर्व काळात कायम अस्तित्वात असतो.” जगातील सर्व भौतिक गोष्टी क्षणभंगुर असल्या तरी, परमात्मा हेच अंतिम सत्य आहे आणि तोच या संपूर्ण सृष्टीचा आधार आहे, हे त्यांनी श्रोत्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितले.
महाराजांनी स्पष्ट केले की, मानवी आत्मा हा परमात्म्याचाच अविभाज्य अंश आहे. त्यामुळे मानवाने भौतिक सुखांच्या मागे न धावता, खरी प्रगती केवळ आत्मिक उन्नती साधण्यात आहे. किर्तनाच्या माध्यमातून महाराजांनी भक्ती आणि वैराग्याचा संदेश देत उपस्थितांना अध्यात्मिक विचारांची नवी दिशा दिली. महाराजांचे निरूपण ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी किर्तनाला साथसंगत करण्यासाठी ह.भ.प. अविनाश महाराज जामनेरकर (गायनाचार्य), ह.भ.प. कैलास महाराज, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज राजूरकर, ह.भ.प. विशाल महाराज चिलगावकर यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
दरम्यान, या सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी, उद्या बुधवारी ह.भ.प. नारायण महाराज निंभोरा यांचे ‘विनोद सम्राट’ म्हणून प्रसिद्ध असलेले दणदणीत किर्तन आयोजित करण्यात आले आहे. मा. नगरसेवक प्रशांत नाईक यांनी परिसरातील सर्व नागरिकांनी या अध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.



