नागपूर (वृत्तसंस्था) फ्युएल गेजमध्ये निर्माण झालेल्या अडचणीमुळे स्पाइस जेटचे बेंगळुरू ते दिल्ली जाणारे विमानाचे मध्यरात्री दीड वाजता नागपूर विमानतळावर लँडिंग करण्यात आले. दरम्यान, पहाटे ५.३० पर्यंत सर्व प्रवासी विमानातच होते. त्यानंतर त्यांना खाली उतरवण्यात आले. परंतु अजूनही प्रवाशांची दिल्ली जाण्याची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही.
रात्री ९.३० वाजता बेंगळुरू येथून उड्डाण केलेले विमान दिल्लीला मध्यरात्री १२.३० पर्यंत पोहोचणे अपेक्षित होते. तांत्रिक अडचणीमुळे ते पोहोचलेले नाही. अजूनही प्रवासी नागपूर विमानतळावर ताटकळत उभे आहेत. स्पाइसजेटचे काउंटर नागपूर विमानतळावर नसल्यामुळे कंपनीकडून प्रत्यक्ष कुणीही प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून दिलेली नाहीय. विमानतळ प्राधिकरणाने केवळ चहा आणि पाण्याची सोय केली.