Home क्राईम भरधाव ट्रकने दुचाकीला उडविले; प्रौढ ठार तर दुचाकीस्वार गंभीर जखमी

भरधाव ट्रकने दुचाकीला उडविले; प्रौढ ठार तर दुचाकीस्वार गंभीर जखमी


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील पिंपरी बुद्रुक फाट्यावर गुरुवारी, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात माळपिंप्री येथील प्रिय रंजन महाराज (वय ४५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना घेण्यासाठी आलेल्या प्रवीण नारायण पाटील (वय २७) या दुचाकीस्वारासह ते महामार्ग ओलांडत असताना, समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एमएच १८, बीए ०१८८) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत महाराज जागीच ठार झाले, तर प्रवीण पाटील यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर वाहतूक ठप्प: ग्रामस्थांचा रास्ता रोको
या अपघातानंतर अनियंत्रित झालेला ट्रक महामार्गावर उलटला. या ट्रकखाली आल्याने महाराजांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न झाला होता. घटनेची माहिती मिळताच पिंपरी बुद्रुक, माळपिंप्री, पिंपळकोठा खुर्द आणि बुद्रुक या चारही गावांतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तात्काळ महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे महामार्गावर जवळपास २ ते ३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली.

प्रशासनाचे आश्वासन: गतिरोधकाची मागणी
ग्रामस्थांच्या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गायकवाड आणि तहसीलदार प्रदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अपघात टाळण्यासाठी या चौकात गतिरोधक किंवा उड्डाणपूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. तहसीलदार पाटील यांनी यावर लेखी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आणि महामार्ग मोकळा केला.

मनमिळाऊ महाराजांच्या निधनाने शोककळा
प्रिय रंजन महाराज हे माळपिंप्री येथील कबीर मंदिरात वयाच्या ११ व्या वर्षापासून सेवा करत होते आणि ते ब्रह्मचारी होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण पिंपरी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये शोककळा पसरली आहे. ते एक मनमिळाऊ आणि शांत स्वभावाचे व्यक्तीमत्व होते. या दुर्दैवी घटनेमुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान, गंभीर जखमी प्रवीण पाटील यांना जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, महाराजांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी एरंडोल येथे पाठवण्यात आला आहे.


Protected Content

Play sound