भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील रेल्वे हेरिटेज गार्डन परिसरात मंगळवारी ३ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवर असलेले दोघे जण जखमी झाले असून, दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याप्रकरणी सोमवारी ९ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, रिजवान हारुण खाटीक (वय ३५, रा. जुना सातारा, भुसावळ) हा तरूण आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच १९ बीएन ०१३५) मित्र रफिक सुभान खाटीक (वय ५८) यांच्यासह रेल्वे हेरिटेज गार्डनजवळील रोडवरून जात होते. दरम्यान, रात्री साडे ९ वाजेच्या सुमारास वसई ते भुसावळ या मार्गावर धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने (क्रमांक एमएच १४ एलएक्स ८९२५) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या धडकेमुळे दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेल्याने त्यांना दुखापत झाली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. जखमींना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले असून, या अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले आहे. या घटनेप्रकरणी रिजवान खाटीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



