भरधाव बुलेटची कारला जोरदार धडक: बुलेटस्वार किरकोळ जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात भरधाव वेगाने बुलेट चालवणाऱ्या एका विद्यार्थ्याने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने अपघात घडला. ही घटना बुधवारी १५ जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता सेंट जोसेफ शाळेजवळील शिवराम नगर परिसरात घडली. धडकेनंतर बुलेटस्वार गटारीत पडला असून, सुदैवाने तो किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

जळगाव शहरातील ओंकारेश्वर मंदिराकडून (एमएच १९, ईडी ९९२९) क्रमांकाची बुलेट भरधाव वेगाने जात होती. सेंट जोसेफ शाळेजवळ समोरून येणाऱ्या (एमएच १९, ईजी १५५८) क्रमांकाच्या कारची आणि बुलेटची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक एवढी तीव्र होती की, कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले, तर कारमधील एअरबॅग उघडल्यामुळे चालक सुदैवाने बचावला. याच अपघातात बुलेटस्वार तरुण गटारीत पडला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला गटारीतून बाहेर काढले. यात बुलेटस्वार किरकोळ जखमी झाला आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी बुलेटस्वार तरुणाला तातडीने मदत केली.

महाविद्यालयीन तरुणांद्वारे भरधाव वेगाने दुचाकी चालविण्याचे प्रकार शहरात वारंवार घडत आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. काही महिन्यांपूर्वी वाहतूक विभागाने अशा अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाईची मोहीम राबवून, त्यांच्या दुचाकी जप्त केल्या होत्या आणि दंडात्मक कारवाईही केली होती. तरी देखील पालक हे अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यास देत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content