Home Cities अमळनेर अर्थसंकल्पात महिलांच्या सशक्तीकरणाला विशेष प्राधान्य – खासदार स्मिता वाघ

अर्थसंकल्पात महिलांच्या सशक्तीकरणाला विशेष प्राधान्य – खासदार स्मिता वाघ


अमळनेर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 हा ‘विकसित भारत’च्या दिशेने देशाला अधिक भक्कमपणे नेणारा असल्याचे मत जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता उदय वाघ यांनी व्यक्त केले आहे. संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या 12 वर्षांच्या स्थिर शासनकाळातील आर्थिक अनुशासन, सुधारणा आणि सातत्यपूर्ण धोरणांचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी सांगितले.

जागतिक स्तरावर अनेक आर्थिक आणि भू-राजकीय आव्हाने असतानाही भारताने सुमारे 7 टक्क्यांचा विकासदर कायम राखला आहे, याकडे लक्ष वेधत स्मिता वाघ यांनी हा अर्थसंकल्प ‘विकसित भारत’च्या मजबूत पायाभरणीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे स्पष्ट केले. या बजेटमध्ये सामाजिक प्रभाव, समावेशक विकास आणि जनकल्याण यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले असून, विशेषतः महिलांच्या सशक्तीकरणावर मोठा भर देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

महिलांसाठी लक्ष्मीपती दीदी योजना, महिला उद्योजकतेला प्रोत्साहन, बालिका शिक्षणाचा विस्तार, STEM क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवणे आणि महिला-नेतृत्वाखालील विविध योजनांना अधिक बळ देण्याचा सरकारचा मानस असल्याचे खासदार वाघ यांनी सांगितले. या सर्व उपाययोजनांमुळे महिलांना केवळ लाभार्थी न ठेवता राष्ट्रनिर्माणातील सक्रिय आणि सक्षम भागीदार बनवण्याचे उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या अर्थसंकल्पात युवक, शेतकरी, कामगार आणि MSME क्षेत्र हे प्रमुख केंद्रबिंदू ठरले आहेत. AI-आधारित कौशल्य विकास कार्यक्रम, नव्या रोजगार संधी, कृषी तंत्रज्ञानाचा अधिक प्रसार, ग्रामीण अर्थव्यवस्थेची मजबुती आणि उद्योग व उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करण्यावर सरकारने विशेष लक्ष केंद्रित केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील जळगावसह विविध जिल्ह्यांना या अर्थसंकल्पाचा थेट लाभ होणार असल्याचे मत स्मिता वाघ यांनी व्यक्त केले. औद्योगिक विकास, कृषी क्षेत्र, लॉजिस्टिक्स, महिला स्वयंसहाय्यता गट आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांना या बजेटमुळे नवी गती आणि संधी मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे स्थानिक पातळीवर आर्थिक विकासाला चालना मिळून युवकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील.


Protected Content

Play sound