महिला सुरक्षेवर विद्यापीठात उद्या विशेष व्याख्यान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ८ मार्च रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. “कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) कायदा, २०१३” या महत्त्वाच्या विषयावर विधी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. रेखा पाहुजा मार्गदर्शन करणार आहेत.

डॉ. पाहुजा या एस.एस. मणियार विधी महाविद्यालयाशी संलग्न असून, महिला हक्क आणि न्यायिक साक्षरता वाढवण्यासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. महिलांच्या कार्यस्थळी सुरक्षितता आणि कायदेशीर संरक्षण याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हे व्याख्यान घेण्यात येत आहे. व्याख्यान विद्यापीठाच्या अधिसभागृहात शनिवारी ८ मार्च रोजी दुपारी १२ ते १२.४५ या वेळेत होणार आहे. विद्यार्थिनींना तसेच महिला कर्मचाऱ्यांना कायद्याची समज वाढावी आणि त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

या व्याख्यानामुळे महिला सबलीकरण आणि कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंधाबाबत अधिक स्पष्टता मिळेल, असे आयोजकांचे म्हणणे आहे. विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांसह सर्वांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन  डॉ.नीता व्ही पाटील, समन्वयक अंतर्गत महिला सुरक्षा समिती यांनी केले आहे.

Protected Content