जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त ‘सन्मान नारी शक्तिचा’ कार्यक्रमात महिलांचा विशेष सन्मान

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील लोणखुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त “सन्मान नारी शक्तिचा” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात १४ महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच डॉ. शशिकांत पाटील यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पूजन व वंदन करून करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात सरपंच शशिकांत पाटील यांनी ग्रामस्थांना अधिकारांसोबतच कर्तव्यांच्या पालनाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी वेळेवर करभरणा, जन्म-मृत्यू-लग्न नोंदणी आणि सार्वजनिक स्वच्छतेची आवश्यकता यावर विशेष भर दिला.

सभापती अशोक पाटील यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी लोणखुर्द ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. “माझं गाव, माझा अभिमान” या भावनेने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आरोग्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या खटाबाई पाटील, जनाबाई पाटील, रमणबाई पाटील, शिक्षिका सुरेखा पाटील, ज्योतिबाला बच्छाव, माध्य शिक्षिका प्रतिभा जाधव, संगीता पाटील, पोलीस पाटील तनूजा पाटील, ग्रा.पं. सदस्य निलाबाई पाटील, ललिता पाटील, प्रतिभा पाटील, सुमनताई भील, उपसरपंच मीनाताई भील, आशाताई अश्विनी भील आणि मदतनीस कविता पाटील अशा १४ महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. अंगणवाडी सेविका, शिक्षिका, ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका आणि मदतनीस अशा महिलांना स्नेहवस्त्र, भारतीय संविधान प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

गावातील महिलांनी या कार्यक्रमातून प्रेरणा घेत, गावपातळीवरील उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग वाढविण्याचा संकल्प केला. याशिवाय आर्थिक वर्ष 2025-26 च्या कृती आराखड्यात महिलांच्या समस्या समाविष्ट करण्यासाठी विचारमंथन झाले. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरंक पाटील यांनी केले, तर आभार हिमानी पाटील यांनी मानले. ग्रामपंचायत कर्मचारी व गावकऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

Protected Content