Home Cities जळगाव इंडियापोस्टच्या विविध योजनांवर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन

इंडियापोस्टच्या विविध योजनांवर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे इंडियापोस्टच्या विविध योजनांवर आधारित विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. “इंडिया पोस्ट ऑफिस स्कीम्स अँड बेनिफिट्स” या विषयावर आयोजित या कार्यक्रमामध्ये बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना सखोल माहिती देण्यात आली.

फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत घेण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून श्री. शेखर बी. इंगळे (डी.ए., इंडिया पोस्ट, जळगाव विभाग, जळगाव मुख्य कार्यालय तसेच बिझनेस करस्पॉन्डंट, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, जळगाव शाखा) यांनी उपस्थित राहून इंडिया पोस्टद्वारे नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या योजनांबाबत अत्यंत माहितीपूर्ण व सुलभ शैलीत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून पोस्ट ऑफिसच्या योजनांमधील गुंतवणुकीचे फायदे, सुरक्षितता आणि दीर्घकालीन लाभ यांचे स्पष्टीकरण मिळाले.

त्यांच्यासमवेत श्री. सतीश पाटील (डेव्हलपमेंट ऑफिसर) यांनी देखील आपले मौल्यवान विचार उपस्थितांसमोर मांडले. दोन्ही मान्यवरांनी पोस्ट ऑफिसच्या योजना म्हणजे केवळ बचतीसाठी नव्हे, तर आर्थिक शिस्त, भविष्याचा सुरक्षित आधार व शाश्वत गुंतवणूक यांचे उत्तम माध्यम कसे आहे, हे पटवून दिले.

कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शासकीय बचत योजनांची माहिती देणे, आर्थिक साक्षरता वाढवणे आणि भविष्यातील आर्थिक नियोजनाची गरज अधोरेखित करणे हे होते. योजनांमध्ये सुकन्या समृद्धी योजना, सीनियर सिटिझन सेविंग्स स्कीम, पीपीएफ, एनएससी, आरडी आणि पोस्ट ऑफिस एफडी यांचा समावेश होता.

या उपक्रमामुळे उपस्थित शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना केवळ योजना समजल्या नाहीत, तर त्यामागील उद्देश आणि समाजातील सर्व स्तरांसाठी त्यांचे महत्त्वही स्पष्ट झाले. उपस्थितांनी या सत्रातून मौल्यवान माहिती, आर्थिक शिस्तीची प्रेरणा आणि शाश्वत गुंतवणुकीचे महत्व शिकल्याची भावना व्यक्त केली.

या कार्यक्रमामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये आर्थिक साक्षरतेचा जागर घडवण्यात यश आले असून, अशा प्रकारचे उपक्रम नियमित होण्याची गरज असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.


Protected Content

Play sound