
तरसोद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येत्या १७ सप्टेंबरपासून राज्यभरात सुरू होणाऱ्या महसूल सेवा पंधरवड्याच्या अनुषंगाने मौजे तरसोद (ता. जळगाव) येथील तलाठी कार्यालयात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. महसूल विभागाच्या विविध सेवा गावागावात पोहोचवण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली असून, स्थानिक शेतकऱ्यांनीही या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या विशेष ग्रामसभेत महसूल सेवा पंधरवड्यांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये शीत शिवार रस्ते, पानंद रस्ते तसेच गाव नकाशावर नसलेले परंतु प्रत्यक्षात वापरात असलेले वहिवाटीचे रस्ते यांची यादी तयार करण्याचे कार्य हाती घेण्यात आले असून, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित ग्रामस्थांनी या प्रक्रियेस सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
महसूल सेवा पंधरवड्यात दाखले वाटप, क्षेत्रस्ते मोकळे करणे, रस्त्यांना अधिकृत क्रमांक प्रदान करणे, जिवंत सातबाऱ्यातील वारस नोंदी, तसेच इतर विविध शासकीय प्रमाणपत्रांचे वितरण यासारखी कामे केली जाणार आहेत. या सर्व सेवांसाठी नागरिकांनी दिलेल्या कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले.
ग्रामसभेस सरपंच संतोष सावकारे, ग्रामपंचायत सदस्य बऱ्हाटे, मंडळ अधिकारी मिलिंद देवरे, ग्रामसेवक नरेंद्र साळुंखे, ग्राम महसूल अधिकारी रुपेश ठाकूर, महसूल सेवक ज्ञानेश्वर कोळी, गावातील लोकप्रतिनिधी, शेतकरी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे दिली.
या विशेष बैठकीत महसूल विभाग आणि ग्रामस्थांमध्ये समन्वय वाढवण्याचा प्रयत्न दिसून आला. गावपातळीवर शासकीय सेवा पोहचवण्यासाठी महसूल सेवा पंधरवडा हा प्रभावी उपक्रम ठरणार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.



