यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | उत्तर महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावरील चैत्रोत्सवानिमित्त यावल एसटी आगाराच्या वतीने नांदुरी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. या विशेष बससेवांचा लाभ घेण्याचे आवाहन आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी केले आहे.
दि. ७ एप्रिल ते १३ एप्रिल २०२५ या कालावधीत, सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी दररोज सकाळी ६ वाजता यावल बसस्थानकावरून विशेष बस निघणार आहे. प्रवाशांची संख्या ४४ किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास, थेट संबंधीत गावातूनही विशेष बस सोडण्यात येणार आहे, अशी माहितीही महाजन यांनी दिली. महिलांना, जेष्ठ नागरिकांना, अमृत जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग प्रवाशांना राज्य परिवहन मंडळाच्या नियमानुसार भाड्यात सवलत देण्यात येणार आहे.
यावल आगारास अलीकडेच ११ नवीन एसटी बसेस प्राप्त झाल्याने प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे आगार सूत्रांकडून सांगण्यात आले. सप्तशृंगी मातेच्या चैत्र यात्रेचे औचित्य साधून भाविकांनी या विशेष बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावल आगार प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.