जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिव्यांग मंडळाने राज्यभरात आदर्शवत अशी ‘कुपन प्रणाली’ यंत्रणा आणल्याने दिव्यांगांचे त्रास थांबले. यामुळे पारदर्शक काम झाले. या ऐतिहासिक कामगिरीने दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी न्याय मिळाला, असे प्रतिपादन प्रतीक्षा जनसेवा फाऊंडेशन, जळगावचे उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी केले.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दिव्यांग मंडळात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विशेष उपक्रम मंगळवारी दि. ३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष तथा उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे होते. प्रसंगी मान्यवरांकडून दिव्यांग हेलन केलर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. प्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. तसेच, दिव्यांग मंडळातील कर्मचाऱ्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.
यावेळी गणेश पाटील यांनी, दिव्यांग बोर्डने गेल्या ३ वर्षात उत्कृष्ट कार्य केले असून दिव्यांगांना दिलासा देण्याचे काम केल्याबाबत सांगितले. तर डॉ. पोटे यांनी, दिव्यांग मंडळाची कार्यपद्धती विशद करून मंडळाला अधिष्ठातांच्या मार्गदर्शनाखाली चांगले सहकार्य लाभत असल्याचे म्हणाले. दिव्यांग मंडळातील तक्रारी आता नाहीशा होत असून केवळ संकेतस्थळाबाबत अडचणी शिल्लक असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी सहयोगी प्रा. डॉ. संगीता गावित, डॉ. पंकज घोगरे, डॉ. यश महाजन, कर्मचारी चेतन निकम, दत्तात्रय पवार, आरती दुसाने, विश्वजीत चौधरी, विशाल पाटील, दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन, प्रतीक्षा जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील, सचिव जितेंद्र पाटील, शाकीर खान, अशोक बिर्ला, रौनक खान, हारून पटेल यांचेसह शासकीय दिव्यांग संमिश्र केंद्रातील विद्यार्थी उपस्थित होते.