
इंदुर (वृत्तसंस्था) लोकसभा स्पीकर आणि 8 वेळेच्या खासदार सुमित्रा महाजन यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. शुक्रवारी त्यांनी एक पत्र जारी केले, त्यात त्यांनी लिहीले की, भाजपला माझ्या जागेवद्दल शंका आहे आणि त्यामुळेच त्यांना निर्णय घ्यायला वेळ लागत आहे. पक्षाने जास्ती विचार करण्याची गरज नाहीये, मीच निवडणुकीतून माघार घेत आहे. पक्षाने आता इंदुरच्या जागेवर लवकर दुसरे नाव ठरवले पाहिजे.
75 वर्षांवरील नेत्यांना उमेदवारी न देण्याबाबत भाजपाकडून धोरण निश्चित करण्यात आले होते. या धोरणामुळे पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना यावेळी उमेदवारी देण्यात आलेली नाही. तसेच पक्षाच्या इंदूरमधील दिग्गज नेत्या सुमित्रा महाजन यांच्या उमेदवारीबाबतही संभ्रम निर्माण झाला होता. मावळत्या लोकसभेच्या अध्यक्ष असलेल्या सुमित्रा महाजन या इंदूर येथून सलग आठवेळ लोकसभेवर निवडून आल्या होत्या. तसेच 80 वर्षीय सुमित्रा महाजन यांची इंदूरमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता असल्याने त्यांना उमेदवारी नाकारणे पक्षश्रेष्ठींना शक्य होत नव्हते. अखेरीस सुमित्रा महाजन यांनीच निवडणूक न लढवण्याची घोणषा करून ही कोंडी फोडली. दरम्यान, याआधी केंद्रीय मंत्री उमा भारती आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी देखील निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. उमा भारती यांनी नकार दिल्यानंतर त्यांना पक्षाचा उपाध्यक्ष करण्यात आले तर सुषमा यांची प्रकृती खराब असल्यामुळे त्यांनी माघार घेतली आहे.