नवी दिल्ली वृत्तसंस्था | आर्यन खान प्रकरणावरून एकूणच ड्रग्जचा वापर चिंतेचा विषय बनला असता राज्यसभेच्या एका खासदाराने मात्र अंमली पदार्थ हे वेदना कमी करत असल्यामुळे त्यांच्यावर कर लाऊन त्यांना वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.
ज्येष्ठ वकील आणि कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार केटीएस तुलसी यांनी ड्रग्जवर केलेले विधान वादाच्या भोवर्यात सापडले आहे. ते म्हणाले की, मादक द्रव्ये जीवनावश्यक असल्याने यावर बंदी घालण्याऐवजी याच्या मर्यादीत प्रमाणातील वापराला परवानगी हवी. गुटखा, दारू, सिगरेट, तंबाखू यांसारख्या पदार्थांचे सेवन कर भरून केले जात याच प्रमाणे ड्रग्जनाही सूट देण्यात यावी. ड्रग्ज हे जीवनावश्यक असून त्यामुळे जीवनातील वेदना कमी होतात, त्याचा समतोल वापर केला पाहिजे, असे खासदार केटीएस तुलसी यांनी म्हटले आहे. ड्रग्जमुळे आयुष्यातील वेदना कमी होतात, असे सांगताना तुलसी म्हणाले, दारू, गुटखा, तंबाखूमुळेही हानी होते. मात्र यांच्यावर कर भरून त्याचे सेवन करू दिले जाते. मग ड्रग्ज का नाही? करवसुली झाल्यानंतर ड्रग्जचा वापर करण्यास परवानगी दिली पाहिजे.
तुलसी म्हणाले की, अनेक प्रसंगी ड्रग्जच्या माध्यमातून औषधे घ्यावी लागतात, त्यामुळे ड्रग्जच्या वापरास परवानगी का देऊ नये? एनडीपीएस(नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस) कायदा, १९८५ मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे कारण त्याचा वापर लोकांना त्रास देण्यासाठी केला जातो. एनडीपीएस कायद्याचा वारंवार गैरवापर लोकांना अंमली पदार्थांच्या जास्त किंवा कमी वापराबाबत त्रास देण्यासाठी केला जातो. एनडीपीएस कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे, असे केटीएस तुलसी म्हणाले.
एकीकडे ड्रग्जचा वापर चिंतेचा विषय बनत असतांना दुसरीकडे राज्यसभा सदस्य केटीएस तुलसी हे त्याचे समर्थन करत असल्याची बाब विरोधाभासी असून यावर आता तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.