नवीदिल्ली, वृत्तसंस्था | महाराष्ट्रातील सत्तापेच सुटण्याची शक्यता निर्माण झाली असून शिवसेनेसोबत आघाडी करण्यास काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संमती दिली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीसोबत एकत्रित बैठकीआधी काँग्रेस नेत्यांची पक्ष मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. या बैठकीसाठी मल्लिकार्जुन खरगे, ए.के. अँटोनी, के.सी. वेणुगोपाल, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.
भाजपासोबत युती तोडल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र काँग्रेसमधून काही नेत्यांचा तसेच खुद्द सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्यास विरोध असल्याने चर्चा लांबणीवर पडत होती. राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील जोपर्यंत काँग्रेसकडून होकार येत नाही, तोपर्यंत शिवसेनेला पाठिंबा दर्शवणार नाही असे सांगितले होते. यामुळे काँग्रेस काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यानंतर बोलताना त्यांनी सोनिया गांधींसोबत राज्यातील सत्तास्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नसून, शिवसेनेसोबतही अशी कोणती चर्चा सुरु नसल्याचे सांगितल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आपल्या वक्तव्यांनी शरद पवारांनी सर्वांनाच बुचकळ्यात टाकले होते.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर चर्चा झाली. पण, अशी काही चर्चाच झाली नसल्याचे शरद पवार यांनी सोमवारी सोनियांच्या भेटीनंतर सांगितल्याने विविध तर्कवितर्क लढविण्यात येत होते. तसेच भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रसंगी शिवसेना सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची काँग्रेसची प्राथमिक तयारी होती. मात्र, काँग्रेसने सत्तेत सहभागी व्हावे, अशी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची स्पष्ट भूमिका होती. त्याप्रमाणे काँग्रेस सत्तेत सहभागी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे राज्यातील नेतेही शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल होते.