यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी आता तालुका पातळीवरही रंगू लागली आहे. यावल तालुक्यातील साकळी-दहिगाव जिल्हा परिषद गटातून प्रभाकर अप्पा सोनवणे आणि त्यांचे चिरंजीव संदीप प्रभाकर सोनवणे यांच्या संभाव्य उमेदवारीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे हे मागील तीन वेळा विविध गटांतून विजयी झालेले अनुभवी नेते आहेत. त्यांनी २००६ मध्ये साकळी-दहिगाव गटातून, २०११ मध्ये भालोद–पाडळसा गटातून आणि २०१७ मध्ये न्हावी–बामणोद गटातून विजय मिळवला होता. सलग तिन वेळा विजयी होण्याचा मान मिळवणारे ते यावल तालुक्यातील प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी राबवलेली विकासकामे आणि सर्वसामान्यांशी असलेला दांडगा जनसंपर्क यामुळे त्यांचे जनाधार अधिक मजबूत झाल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

या पार्श्वभूमीवर, त्यांच्या चिरंजीव संदीप प्रभाकर सोनवणे हे वढोदे ग्रामपंचायतीचे सरपंच असून सरपंच परिषद महाराष्ट्रचे यावल तालुका अध्यक्ष आहेत. हे देखील या वेळी भाजपच्या तिकिटावर साकळी-दहिगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारीसाठी चर्चेत आले आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी स्थानिक पातळीवर विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याने त्यांची प्रतिमा कार्यक्षम व तरुण नेतृत्व म्हणून निर्माण झाली आहे.
भाजपकडून या गटासाठी उमेदवारी निश्चित होण्यापूर्वीच सोनवणे पिता–पुत्र हे दोघेही जनतेच्या संपर्कात आहेत. त्यांच्या दावेदारीमुळे साकळी-दहिगाव गटातील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
प्रभाकर सोनवणे आणि संदीप सोनवणे या पिता–पुत्रांच्या संभाव्य उमेदवारीमुळे यावल तालुक्यातील साकळी-दहिगाव जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनुभवी नेतृत्व आणि नव्या पिढीचे समन्वयित नेतृत्व या निवडणुकीत पाहायला मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.



