घरगुती वादातून जावयाने केली सासूची हत्या

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विरारमध्ये घरगुती वादातून आपल्या सासूची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील चौकशीला सुरुवात केली. ही घटना बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. घटनेच्या दिवशी आरोपी दारूच्या नशेत होता, अशीही माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता. परंतु, आरोपीच्या मुलांनी त्याला घरात कोंडून ठेवल्याने तो पकडला गेला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत खैरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो गेल्या काही दिवसांपासून पत्नी कल्पना, दोन मुले आणि सासू यांच्यासोबत भाड्याच्या घरात राहत होता. प्रशांतला दारूचे व्यसन होते. तो अनेकदा दारूच्या नशेदत पत्नी आणि सासू लक्ष्मी खांबे यांना शिवीगाळ करायचा. दरम्यान, बुधवारी कल्पना काही कामानिमित्त बाहेर गेली असताना आरोपीचे लक्ष्मी यांच्यासोबत भांडण झाले. यानंतर राग अनावर झाल्याने प्रशांतने लक्ष्मी यांचे हात पाय बांधले आणि तिच्या मानेवर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत लक्ष्मी यांचा जागीच मृत्यू झाल्याचा संशय आहे.

सासूची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळ काढण्याच्या तयारीत होत. परंतु, त्याच्या मुलांनी बाहेरून घराची कडी लावून त्याला आत कोंडून ठेवले आणि आरडाओरडा करून आजूबाजुच्या लोकांना याबाबत माहिती दिली. यानंतर शेजाऱ्यांनी याबाबत विरार पोलिसांना कळवले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घऊन पंचनामा केला आणि आरोपीला अटक केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Protected Content