नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कॉंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या घरात सुरक्षा रक्षकांना चकवा देऊन काही अज्ञात व्यक्ती गेल्या आठवड्यात घुसल्या होत्या, अशी खळबळजनक माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच गांधी कुटुंबातील सर्व सदस्यांची एसपीजी सुरक्षा काढून घेण्यात आल्यानंतर ही घटना घडली आहे.
दिल्लीतील लोधी इस्टेट येथे प्रियांका गांधी यांचे निवासस्थान आहे. गेल्या आठवड्यात याच निवासस्थानी काही अज्ञात व्यक्ती कोणाचीही परवनागी न घेता आले होते. सेल्फी घेण्यासाठी या व्यक्तींनी आग्रह धरला होता. त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता अपॉइंटमेंट न घेताच ते सगळेजण प्रियांका यांच्या घरात आले होते, असे उघड झाले आहे. या घटनेमुळे गांधी कुटुंबाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत गांधी कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाकडे (सीआरपीएफ) तक्रार करण्यात आली असून अधिक चौकशी सुरू आहे.