हैदराबाद (वृत्तसंस्था) शहराची खास ओळख असलेल्या येथील ४०० वर्षे जुन्या चारमीनार या जगप्रसिद्ध इमारतीचा वरच्या मजल्याचा काही भाग कोसळल्याने या इमारतीच्या संरक्षणाचा मुद्दा चिंतेचा विषय बनला आहे. राज्याच्या पुरातत्व विभागाने काही दिवसांपूर्वीच या इमारतीची डागडुजी केली होती, हे विशेष.
अशाचप्रकारे काही दिवसांपूर्वी चारमीनारच्या पश्चिमेकडील भागातील एक मोठा हिस्साही तुटला होता. दररोज देश-विदेशांतील हजारो पर्यटक चारमीनारला भेट देत असतात. या इमारतीची स्थिती नाजूक असल्याने पर्यटकांना सध्या पहिल्या मजल्यापर्यंतच जाण्याची परवानगी देण्यात येत आहे. मोहम्मद कुतुब शाह याने सन १५९१ मध्ये ही ऐतिहासिक वास्तु निर्माण केली होती. चारमीनार जगात प्रसिद्ध असून तो हैदराबाद शहराची खास ओळख समजला जातो.