Home Cities धरणगाव धरणगाव बाजार समितीमध्ये सौर ऊर्जा सिस्टीम प्रकल्पाचे उद्घाटन !

धरणगाव बाजार समितीमध्ये सौर ऊर्जा सिस्टीम प्रकल्पाचे उद्घाटन !

0
210

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात आज जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महत्त्वाकांक्षी सौर ऊर्जा सिस्टीमचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे बाजार समितीचे वीज खर्च कमी होऊन बचत होणाऱ्या निधीचा उपयोग शेतकरी हिताच्या योजनांसाठी करता येणार आहे. याचसोबत, शेतकरी महिला व पुरुषांची प्रतिकृती (शिल्प) उभे करून शेतकऱ्यांच्या कष्टाला व सन्मानाला उजाळा देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिता वाघ होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमोल पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (जेडीसीसी) अध्यक्ष संजय पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, पीसी आबा पाटील, डी. जी. पाटील आणि माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. बाजार समितीचे सभापती जिजाबराव पाटील यांनी प्रास्ताविकातून बाजार समितीच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि सौर ऊर्जा प्रकल्पामागील भूमिका स्पष्ट केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात, ‘धरणगाव बाजार समितीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक आदर्श घालून दिला आहे. ही बचत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वापरावी’, असे आवाहन केले.

यावेळी सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून बाजार समितीच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या सोहळ्याला भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, शेखर अत्तरदे, भगवान महाजन, शिवसेना उपतालुका प्रमुख पी.एम.पाटील, संजय महाजन तसेच उपसभापती किरण पाटील, सचिव नवनाथ तायडे, संचालक मंडळ, परिसरातील विकास सोसायट्यांचे चेअरमन, सरपंच आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक सुदाम पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गजानन नाना पाटील (शिवसेना) यांनी मानले.


Protected Content

Play sound