स्वतःच्या कौशल्याच्या बळावर उत्तुंग भरारी घेतली – सामाजिक कार्यकर्त्या रुमादेवी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज राजस्थानमधील महिलांनी स्वतःच्या कौशल्याच्या बळावर उत्तुंग भरारी घेतली आहे. त्यांना कामासाठी प्रोत्साहन दिल्यानंतर त्यांनी आत्मविश्वासाने स्वतःचे जग निर्माण केले आहे. कपडे शिवण्यात महिलांचे कलागुण, कामाचे व्यवस्थापन अत्यंत कौशल्यपूर्ण आहे, त्याद्वारे त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन बाडमेर, राजस्थान येथील प्रगतिशील सामाजिक कार्यकर्त्या रुमादेवी यांनी केले.

 

राजस्थान येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रुमादेवी यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी कथनाचा कार्यक्रम श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे रविवारी दि. ३ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता संभाजीराजे नाट्यगृहात घेण्यात आला. यावेळी मंचावर जैन समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, नयनतारा बाफना, कस्तुरचंद बाफना, रमेशदादा जैन, सुवर्ण उद्योजक अजय ललवाणी, सुशील बाफना, मिनाक्षी जैन, संजय लोढा, श्री जैन युवा फाउंडेशनचे अध्यक्ष पियुष संघवी, सचिव अमोल फुलफगर, कोषाध्यक्ष संदीप सुराणा उपस्थित होते.

 

रुमादेवी यांची मुलाखत उद्योजक संजय लोढा यांनी घेतली. यावेळी,  रुमादेवी यांना त्यांच्या व्यवसायाची सुरुवात करताना अनेक अडचणी आल्या. तो संघर्ष त्यांनी थोडक्यात विशद केला. रुमादेवी या १४ वर्षाची  असताना त्यांची आई वारली. मात्र हिम्मत न हरता कशिदाकारी करून त्यांनी महिला सहकारी जोडल्या. सुरवातीला कामात अडथळे आले. मात्र त्यांनी पुढे जात राहत यशाची शिखरे गाठली.

 

रुमादेवी यांच्याकडे महिलावर्ग एम्ब्रॉयडरी काम अत्यंत लीलया करतात. महिलांनी वस्त्रोद्योगमध्ये भरारी घेतल्यानंतर एकदा जर्मनीचा मेल आला आणि तेथे जाऊन राजस्थानी कारागिरी असलेले विविध डिझाईनची वस्त्रांचे प्रदर्शन दाखवून भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

 

रुमादेवी यांना बोस्टन, न्यूयॉर्क येथेही जाण्याचा योग आला. साध्या सुई धाग्याच्या जोरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या हातून सन्मान झाला तेव्हा मात्र खूप आश्चर्य वाटले. त्यानंतर राज्यपाल, राष्ट्रपती यांच्या हस्तेदेखील सन्मान झाला, हे सुखद क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.

 

पुरस्कार मिळाल्यानंतर निश्चितच माझ्या सहकारी महिलांचा आत्मविश्वास वाढला. त्यांनाही हुरूप आल्याने त्यानी कामाचा व्याप वाढवला, अशी माहिती रुमादेवी यांनी दिली. पुढे अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये सहभागी होता आल्याने तेथील अद्भुत अनुभव देखील त्यांनी विशद केले.

 

शेवटी, माझे ग्राहक माझे प्रेरणास्त्रोत आहेत असे सांगून त्यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आनंद चांदीवाल, रिकेश गांधी, दर्शन टाटिया, प्रवीण छाजेड, प्रवीण पगरिया, विनय गांधी, पारस कुचेरिया आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content