पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पारोळा शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या निमित्ताने मोठा महादेव चौक येथील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
अभिवादन कार्यक्रमात आमदार अमोल पाटील, नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपनगराध्यक्ष रोहन मोरे यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमानंतर शहरातील सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवत मोठ्या संख्येने नागरिक, युवक आणि विविध सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवला.

रक्तदान शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनेकांनी सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवत रक्तदान करून सहभाग घेतला. या शिबिराच्या माध्यमातून रक्तसंकलन करून रुग्णसेवेसाठी मदत करण्याचा उद्देश साध्य करण्यात आला. आयोजकांनी या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी बोलताना आमदार अमोल पाटील म्हणाले की, महात्मा फुले यांनी समाजातील वंचित, शोषित घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत पोहोचवून क्रांतिकारी परिवर्तन घडवले. त्यांच्या विचारांचा प्रसार करणे हीच खरी त्यांना दिलेली आदरांजली आहे. रक्तदान शिबिरासारखे उपक्रम हे सामाजिक समतेच्या त्यांच्या विचारांना पुढे नेणारे ठरतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांनी समाजाला दिशा दिल्याचे सांगितले. फुले यांचे सामाजिक योगदान हे आजही प्रेरणादायी असून तरुण पिढीने त्यांच्या विचारांचा अंगीकार करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. कृतिका आफ्रे, राष्ट्रवादीच्या अन्नपूर्णा पाटील, नगरसेविका तथा गटनेत्या अलका महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष अतुल पवार, शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, भाजपा जिल्हा चिटणीस रवींद्र पाटील, नगरसेवक मनोज जगदाळे, मनीष पाटील, दीपक अनुष्ठान, विवेक पाटील, पंकज मराठे, बापू मिस्री, माजी नगरसेवक बापू महाजन, भाजपा माजी तालुका सरचिटणीस धीरज महाजन, तसेच विविध समाज पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वना महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन पंच विशाल महाजन यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी गोपाल महाजन, परेश महाजन, भूषण महाजन, पप्पू महाजन, समाधान महाजन आणि सनी महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले.



