मुंबई (वृत्तसंस्था) नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तरी त्यांच्या सरकारची अवस्था १९९६च्या वाजपेयी सरकारसारखी होईल. हे सरकार अवघं १३ किंवा १५ दिवसांत कोसळेल, असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. दरम्यान, यंदाचे सरकार त्रिशंकू नसेल.परंतु बाकीचे पक्ष एकत्र बसून स्थिर सरकार देतील, असा अंदाज देखील पवार यांनी वर्तविलेला आहे.
एका वृत्त वाहिनीशी बोलताना पवार यांनी भाकित वर्तवले आहे की, लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा १९ तारखेला होणार आहे. २३ तारखेला निकाल लागणार आहे. त्यापुर्वी सत्तास्थापनेसाठीची तयारी विरोधी पक्षाने सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. भाजपविरोधात सर्व पक्षांची मोट बांधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या २१ मेपर्यंत त्याचे प्रत्यक्ष स्वरूप तुमच्यापुढे येईल, असेही पवारांनी यावेळी सांगितले. केंद्रात मोदी सरकारविरुद्ध मोर्चेबांधणी करण्यात आघाडीवर असलेल्या पवारांनी केलेल्या या भाकिताने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.