मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे यांनी अनेकवेळा आंदोलन आणि उपोषणही केले. मात्र, त्यांच्या मागणीबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. यावरूनच राज्याच्या राजकारणात मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अनेकदा टीका केली.
आता आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले की, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षण देऊ इच्छित आहेत. मात्र, त्यांना देवेंद्र फडणवीस थांबवत आहेत’, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. त्यांच्या या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना मोठं विधान केलं. फडणवीस म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर म्हटलं की, मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मी तो प्रयत्न थांबवला तर त्याच क्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन”, असे देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.