जळगाव प्रतिनिधी । येथील जितो कोविड दक्षता केंद्रात आजवर २० दिवसात ३४ करोनाबाधित रुग्ण योग्य उपचार घेऊन घरी गेले आहेत. तर ५३ रुग्णांवर आत्ता उपचार सुरु झाले आहेत.
गेल्या ५ महिन्यांपासून करोना संक्रमण आजाराचा कहर सुरु आहे. रुग्णसंख्या वाढली तशी शहरात करोनाबाधित रुग्णांवर योग्य उपचार व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने खाजगी कोविड दक्षता केंद्रे उभारली आहेत. त्यात जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जळगाव चाप्टर द्वारा संचलित “जितो कोविड केअर सेंटर” देखील २० दिवसांपासून कार्यान्वित झालेले आहे. हे दक्षता केंद्र राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ ला लागून असणाऱ्या मानराज पार्क जवळील वसतिगृहात सुरु आहे.
ज्या करोनाबाधित रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत अशांवर येथे तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहेत. रुग्णासाठी येथे ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. याठिकाणी डॉ. लीना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित डॉक्टरांची व परिचारिका यांची टीम रुग्णांवर देखरेख करीत आहे. या केंद्रात यशस्वीपणे ३४ व्यक्ती उपचार घेऊन बरे झाले आहेत.
केंद्रात योग्य उपचार मिळतात आणि चांगल्या सुविधा आहेत अशा प्रतिक्रिया बरे झालेल्या रुग्णांनी व्यक्त केल्या आहेत. प्रकल्प प्रमुख सुमित मुथा, हेमंत कोठारी, रविंद्र छाजेड हे केंद्रात व्यवस्थापनाचे काम पाहत असून करोना पोझीटिव्ह रिपोर्ट आलेल्या व लक्षणे नसलेल्या अथवा सौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांनी जितो कोविड दक्षता केंद्रात उपचारासाठी दाखल व्हावे असे आवाहन चेअरमन अजय ललवाणी, मुख्य सचिव दर्शन टाटीया, मुख्य विश्वस्त तेजस कावडिया यांनी केले आहे.