जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज ब्युरो | लोकसभेच्या जळगाव मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार स्मिताताई उदय वाघ यांची विजयाकडे वाटचाल सुरू झाल्याचे संकेत मिळाले असून त्यांना दीड लाखांपेक्षा जास्त मतांची भरभक्कम आघाडी मिळाली आहे. यंदा जळगाव लोकसभा मतदारसंघात मोठी चुरस दिसून आली आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार उन्मेषदादा पाटील यांचे तिकिट कापून माजी आमदार स्मिताताई वाघ यांना उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. संतप्त उन्मेष पाटील यांनी आपले सहकारी तथा पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण बाळासाहेब पवार यांच्यासह थेट शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यानंतर करण पवार यांना जळगावचे तिकिट मिळाले. त्यांनी प्रचाराचा एकच धडाका उडवून दिल्यामुळे आधी भाजपसाठी सोपी वाटणारी निवडणूक ही अंतिम फेरीपर्यंत मोठ्या चुरशीची बनली. शिवसेना-उबाठा पक्षाचे उमेदवार करण पवार यांना ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. त्यांच्यासाठी थेट उध्दव ठाकरे यांनी सभा घेतल्यानंतर प्रचारात अजून रंगत आली. तर स्मिताताई वाघ यांच्या प्रचाराची धुरा आमदार राजूमामा भोळे आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह महायुतीचे सर्व आमदार यांनी सांभाळली.
त्यांना महायुतीच्या तिन्ही मंत्र्यांचे पाठबळ देखील मिळाले. यानुसार, निवडणूक ही मोठ्या चुरशीची झाली असून महायुतीच्या स्मिताताई वाघ आणि महाविकास आघाडीचे करण बाळासाहेब पाटील यांच्यापैकी नेमकी कुणाची सरशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज सकाळी आठ वाजता जळगाव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली. यात दुपारी दोन वाजेपर्यंत महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना एकूण चार लाख तीन हजार चारशे अठरा इतकी मते मिळाली. तर त्यांचे विरोधक करण बाळासाहेब पवार यांना दोन लाख अडोतीस हजार आठशे सत्याऐंशी इतके मते मिळाली आहेत. या माध्यमातून स्मिताताई वाघ यांना तब्बल १ लाख ६४ हजार ५३१ मतांची भक्कम आघाडी मिळालेली आहे. आतापर्यंत निम्म्यापेक्षा जास्त मतमोजणी संपली असून पुढील टप्प्यात इतका लीड भरून काढणे तसे अशक्य मानले जात आहे. यामुळे श्रीमती वाघ यांची विजयाकडे वाटचाल सुरू झाल्याचे संकेत मिळाले आहेत.