अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत प्रदेश उपाध्यक्षपदी विधान परिषदेच्या माजी आमदार श्रीमती स्मिता उदय वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत सक्षम आणि क्रियाशील आणि संघटनात्मक कौशल्य अवगत असणार्या पदाधिकारीना स्थान देण्यात आले आहे. यात स्मिताताई वाघ यांना स्थान मिळाल्याने त्यांच्या या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. विद्यार्थी दशेपासून विद्यार्थी परिषद व चळवळीच्या माध्यमातून भाजप परिवाराशी जोडल्या गेलेल्या स्मिता वाघ कालांतराने भाजपाकडून निवडणूक लढवून जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्यात तेव्हापासून त्यांचा आलेख चढताच राहिला. जिल्हा परिषद अध्यक्षपदा पर्यंत पोहोचल्यानंतर कामाची पावती म्हणून विधान परिषद सदस्य पदाची मोठी संधी त्यांना पक्षाने दिली. सक्षम लोकप्रतिनिधी म्हणुन त्यांचा नावलौकिक असताना त्यांच्यात संघटन कौशल्य हा मोठा गुण असल्याने पक्ष कायम त्यांना संघटनात्मक जवाबदार्या देत राहिला.
दरम्यानच्या काळात जळगाव जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, प्रदेश महिला अध्यक्ष, मुख्य कार्यकारिणीत प्रदेश चिटणीस नंतर उपाध्यक्ष व आता पुन्हा नव्या कार्यकारिणीत प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करून पक्षाने मोठी जवाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.
या नियुक्ती मुळे भाजप कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारला असून एकप्रकारे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळकटी मिळाली आहे.सदर नियुक्तीबद्दल स्मिता वाघ यांचे ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन, जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, जिल्हयातील सर्व आमदार, खासदार, जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.