जळगाव प्रतिनिधी । आमदार स्मिताताई वाघ यांना भारतीय जनता पक्षाने जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
खासदार ए.टी. पाटील यांच्याबाबत आक्षेपाही छायाचित्रे सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर त्यांना भाजप तिकिट देणार नसल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. यामुळे भाजपमधून अनेक नावे समोर आली होती. यात आमदार उन्मेष पाटील, अभियंता प्रकाश पाटील, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार आणि आमदार स्मिता वाघ यांचा प्रामुख्याने समावेश होता. या मतदारसंघातून जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन हे ठरवतील तोच उमेदवार फायनल होईल अशी स्थिती होती. या अनुषंगाने त्यांचे निकटवर्तीय अभियंता प्रकाश पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर होते. मात्र शेवटच्या टप्प्यात संघाशी जवळीक असणार्या विधानपरिषदेच्या सदस्या आमदार स्मिताताई वाघ यांनी बाजी मारली. संघाने त्यांच्या नावाला अनुकुलता दर्शविल्यामुळे अखेर भाजपचे तिकिट त्यांना मिळाले आहे. आज भाजपच्या दुसर्या यादीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
स्मिताताई वाघ या अखील भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भाजपशी जुळल्या होत्या. जिल्हा परिषद सदस्या, जिल्हा परिषद अध्यक्षा, भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा आदी महत्वाच्या पदांवर काम केल्यानंतर त्यांची २०१५ मध्ये विधानपरिषद सदस्यपदी नियुक्ती झाली होती. यानंतर जळगाव जिल्ह्यातील बदलत्या राजकारणात त्यांना लोकसभा निवडणुकीत पक्षाने संधी दिली आहे. त्यांचे पती उदय वाघ हे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. आता स्मिताताईंना थेट लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने वाघ घराण्याचे राजकीय वजन वाढल्याचे मानले जात आहे.