Home Cities भुसावळ ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ वेब पोर्टलचा सहावा वर्धापनदिन सोहळा, ‘नवरत्नांचा सन्मान’ व ‘भुसावळ भूषण’...

‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ वेब पोर्टलचा सहावा वर्धापनदिन सोहळा, ‘नवरत्नांचा सन्मान’ व ‘भुसावळ भूषण’ पुरस्कार जाहीर


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उत्तर महाराष्ट्रातील ‘सर्वात वेगवान, सर्वात विश्वसनीय’ हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ या वेब न्यूज पोर्टलचा सहावा वर्धापनदिन सोहळा येत्या २ ऑगस्ट २०२५ रोजी भुसावळ येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या सोहळ्याला शेकडो वाचक, भुसावळसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रमुख शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. वर्धापनदिनानिमित्त यावर्षीपासून ‘नवरत्नांचा सन्मान’, ‘विशेष सेवा गौरव’ आणि ‘भुसावळ भूषण गौरव पुरस्कार’ असे नवीन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

यावर्षीपासून सुरू होणाऱ्या ‘नवरत्न समर्पण सेवा गौरव पुरस्कार २०२५’ साठी भुसावळ शहरातील विविध क्षेत्रांत प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या नवरत्नांची निवड करण्यात आली आहे. यात आरोग्य क्षेत्रातून प्रवीण फालक, सामाजिक क्षेत्रातून सोनू मांडे, वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. शांतनूकुमार साहू, महिला सबलीकरणमधून रजनी सावकारे, नाट्य (सांस्कृतिक) क्षेत्रातून प्रेरणा देशमुख, भाषा अभ्यासक म्हणून प्र. ह. दलाल, महिला समुपदेशनमधून भारती रंधे-म्हस्के, शैक्षणिक क्षेत्रातून प्राचार्य अनघा पाटील आणि सांस्कृतिक क्षेत्रातून गणेश फेगडे यांचा समावेश आहे.

‘विशेष सेवा गौरव सन्मान’ भुसावळ शहर व विभागाची धुरा सांभाळताना आपल्या कार्याने सर्वांना आपलेसे करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना प्रदान केला जाणार आहे. यात तत्कालीन पोलीस उपअधीक्षक आणि आता श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक असलेले सोमनाथ वाघचौरे, तसेच तत्कालीन उपअधीक्षक आणि आता पुणे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस उपायुक्त असलेले कृष्णात पिंगळे यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला जाईल.

‘भुसावळ भूषण पुरस्कारा’ने तीन विशेष व्यक्तींना गौरवण्यात येणार आहे. यामध्ये भुसावळसारख्या कॉस्मोपॉलीटन शहरातील एम.आय.तेली इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी नूर फातेमा मणियार, जिने निबंध लेखन स्पर्धेत राज्यातून प्रथम येऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान मिळवला. तसेच, बँकॉकमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर स्केटिंगमध्ये सुवर्णपदक पटकावणारा तीर्थराज मंगेश पाटील (भुसावळ) आणि बालभारती अभ्यास मंडळावर निवड झालेले व राज्य शासनाचा शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. जगदीश पाटील यांचाही या पुरस्काराने गौरव करण्यात येईल.

या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह खासदार, आमदार, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व चेअरमन, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, मंडल सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे संपादक अमोल देवरे आणि कार्यकारी संपादक गणेश वाघ यांनी खान्देशातील वाचकप्रेमींना या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound