Home क्राईम एकाच रात्रीत सहा दुकाने फोडली; तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद

एकाच रात्रीत सहा दुकाने फोडली; तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद

0
175

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) परिसरात गुरांच्या बाजाराजवळ असलेल्या सहा वेगवेगळ्या दुकानांचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत तब्बल ६ लाख २० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात रोख रकमेसह चांदीचे शिक्केही चोरीला गेले आहेत. विशेष म्हणजे, चोरी करताना चोरट्यांनी तोंडाला कापड बांधले असले तरी, त्यांची ही संपूर्ण करामत काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे. सोमवार, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता ही चोरी उघडकीस येताच परिसरातील व्यापारी हादरले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत.

एकाच रात्री सहा दुकानांना लक्ष्य
चोरट्यांनी अत्यंत धाडसाने आणि पद्धतशीरपणे गुरांच्या बाजाराजवळील दुकानांना लक्ष्य केले. फिनाईल पुरवठा, बेकरीचा कच्चा माल आणि इतर वस्तूंच्या दुकानांमध्ये ही चोरी झाली. नोमान शकील देशमुख यांच्या न्यू भारत केमिकलमधून सर्वाधिक २ लाख ७५ हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली. तर, राजेंद्र टेकचंद अग्रवाल यांच्या श्रृती इन्टरप्राईजेसमधून २ लाख ५० हजार रुपये रोख आणि चांदीचे नाणे चोरट्यांनी पळवले. याशिवाय, रामकृष्ण पाटील (रोख ४५ हजार), सुनील काकानी (रोख ३० हजार), सचिन चौधरी (रोख १५ हजार) आणि सुकलाल पवार (रोखंडी तिजोरीतून रोख २८ हजार) यांच्या दुकानातूनही लाखोंची रोकड लंपास झाली.

कॅमेरे फोडले, तरी तिघे कैद
चोरीची घटना चित्रीत होऊ नये म्हणून चोरट्यांनी दुकानांवरील तीन ते चार सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोंडाला कापड बांधलेले तीन चोरटे काही कॅमेऱ्यांमध्ये स्पष्टपणे कैद झाले आहेत. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असून, त्याआधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. एकाच रात्री सहा दुकाने फोडल्यामुळे औद्योगिक वसाहतीतील व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी नोमान देशमुख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound