नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात श्रीलंकेमार्गे सहा दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचे हे दहशतवादी असून त्यांच्यामध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे. यामुळे संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गुरूवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांना हा अलर्ट पाठवण्यात आला. तामिळनाडूमध्ये शिरलेल्या दहशतवाद्यांमध्ये एक पाकिस्तानी आणि पाच श्रीलंकेतील तमिळ मुस्लीम असल्याचे पाठवण्यात आलेल्या अलर्टमध्ये नमूद करण्यात आले. तसेच त्यांनी हिंदूंचा पेहराव केला असून ते राज्यभरात दहशतवादी कारवायांच्या तयारीत असल्याचेही म्हटले आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार ते दहशतवादी संरक्षण संस्था, मंदिरं, पर्यटन स्थळ आणि परदेशी दुतावासावर हल्ला करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. श्रीलंकेमार्गे हे दहशतवादी तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे. तसेच तामिळनाडूमध्ये पोलिसांना काही संशयित घातपात घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.