Home Cities अमळनेर एकाच गोठ्यातून सहा गुरांची चोरी ; लोणे येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

एकाच गोठ्यातून सहा गुरांची चोरी ; लोणे येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील लोणे शिवारातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील गट नंबर २९ मधील एका शेतकऱ्याच्या गोठ्यातून पाच म्हशी आणि एक बैल अशी एकूण सहा जनावरे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरून नेली आहेत. या चोरीमुळे शेतकऱ्याचे सुमारे ७२ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल राजाराम पाटील (वय ५०, रा. लोणे, ता. अमळनेर) हे या घटनेतील पीडित शेतकरी आहेत. शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली. पाटील यांच्या लोणे शिवारातील गट नंबर २९ मधील गोठ्यात ही जनावरे बांधलेली होती. रात्रीच्या वेळी संधी साधून अज्ञात चोरट्यांनी ५ म्हशी आणि १ बैल असा एकूण ७२,००० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

सकाळ झाल्यानंतर हा प्रकार अनिल पाटील यांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ गोठ्याच्या परिसरात आणि आजूबाजूच्या शिवारात सर्वत्र शोधाशोध केली, परंतु चोरी झालेल्या जनावरांचा कोणताही मागमूस लागला नाही. अखेरीस, त्यांनी दुपारी १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली.

पोलिसांनी शेतकऱ्याच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सुनील जाधव हे करीत आहेत. शेतीत उपयुक्त असणाऱ्या जनावरांची चोरी झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


Protected Content

Play sound