मैदान नसल्याने खराब रस्त्यावरच जि.प. शाळेच्या क्रीडा स्पर्धा !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कोठा येथील जिल्हा परिषद शाळेला मैदान नसल्याने अतिशय खराब झालेल्या रस्त्यावरच क्रीडा स्पर्धा घ्याव्या लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील कोठा गावातील जिल्हा परिषद शाळेसाठी मैदानाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना खड्डे पडलेल्या रस्त्यावर क्रीडा स्पर्धा खेळाव्या लागल्या असून ही परिस्थिती पालक, शिक्षक आणि स्थानिक प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरली आहे.
हा रस्ता ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 मध्ये तयार करण्यात आला होता. मात्र, अवघ्या तीन महिन्यांतच तो खड्ड्यांनी भरून जीवघेणा झाला आहे. रस्त्याची खराब स्थिती असूनही, विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा या रस्त्यावर आयोजित करण्यात आल्या, ज्यामुळे पालकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रनिंग स्पर्धा आणि इतर क्रीडा उपक्रमांदरम्यान विद्यार्थी पडल्यास किंवा जखमी झाल्यास जबाबदारी कोण घेणार ? हा प्रश्न उपस्थित पालक विचारत आहेत. शाळेला स्वतःचे मैदान उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना असे धोकादायक स्पर्धा खेळाव्या लागणे, शिक्षण व्यवस्थेच्या अपयशाकडे लक्ष वेधत आहे.
या संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक यांनी सांगितले की, शाळेच्या काही भागांमध्ये सध्या बांधकाम सुरू आहे, ज्यामुळे मैदानाचा अभाव निर्माण झाला आहे. तसेच रस्ता नुकताच तयार झाला असला, तरी काही महिन्यांतच त्याची अशी अवस्था होणे, हे मोठे दुर्लक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.
पालक व ग्रामस्थांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेऊन योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. या परिस्थितीवर अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही. पालक आणि ग्रामस्थ आता या प्रकरणी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा विचार करत आहेत, जेणेकरून मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित आणि योग्य सुविधा मिळू शकतील.

Protected Content