मुंबई, वृत्तसंस्था । कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीवर नफावसुलीचा दबाव आहे. बुधवारी सकाळी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली. सोन्याचा २०० रुपयांनी घसरला होता. चांदीच्या किमतीत एक हजार रुपयांची घसरण झाली.
सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५१४०० रुपये झाला आहे. त्याने दिवसभरात ५११३९ रुपयांचा नीचांकी स्तर गाठला. चांदीच्या किमतीत १३०० रुपयांची घसरण झाली असून सध्या चांदीचा भाव एक किलोला ६९५९० रुपये झाला आहे.
सलग दुसऱ्या सत्रात सोने आणि चांदीमध्ये घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी सोन्याचा भाव ०.४४ टक्क्याने कमी झाला होता. चांदीचा भाव ०.४० टक्क्याने घसरला. जागतिक कमॉडिटी बाजारात बुधवारी सोन्याचा भाव ०.१ टक्क्यांनी वाढून १९७१.६० डॉलर प्रती औंस झाला आहे. चांदीच्या दरात प्रती औंस ३ टक्के वाढ झाली असून चांदीची किंमत प्रती औंस २८.२५ डॉलर प्रती औंस आहे.