नवी दिल्ली । दिल्लीमध्ये ज्या भागात कोरोना संसर्गाची व्याप्ती जास्त आहे, अशा भागात मर्यादित प्रमाणावर पुन्हा लॉकडाउन लावण्याचा विचार केला जात असल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.
मागील काही दिवसांपासून दिल्लीत कोरोना संसर्ग झपाट्याने वाढला आहे. वाढते रुग्ण व मृतांची संख्या लक्षात घेऊन लवकरच काही प्रमाणावर सक्ती करावी लागणार असल्याचे सांगून केजरीवाल पुढे म्हणाले की, लग्न समारंभासाठी याआधी 200 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. ही सवलत आता मर्यादित करण्यात आली असून लग्न समारंभासाठी यापुढे केवळ 50 लोकांना हजर राहता येईल. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मर्यादा पूर्ववत केली जाईल. दिल्ली सरकारने संक्रमणाच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविला आहे.
दिल्लीमध्ये गर्दीच्या बाजारपेठा काही दिवस बंद करण्याची परवानगी केंद्राकडे मागण्यात आली आहे. सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये बेड संख्या मर्यादित आहे. या पार्श्वभूमीवर आयसीयू बेडची मागणी केंद्राकडे करण्यात आल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली. केंद्र व राज्य सरकार आपल्यापरीने प्रयत्न करीत असले तरी लोकांनी काळजी घेणे जास्त महत्वाचे आहे. अनेक ठिकाणी लोक मास्क न वापरताच फिरत आहेत. अशा लोकांना माझी विनंती आहे की त्यांनी मास्क लावून वावरावे. सोशल डिस्टंसिंगचे पालन करणेही तितकेच आवश्यक आहे.