Home प्रशासन नगरपालिका फैजपूर नगरपरिषदेत भाजप गटनेतेपदी सिद्धेश्वर वाघूळदे, उपगटनेतेपदी सूरज गाजरे यांची निवड

फैजपूर नगरपरिषदेत भाजप गटनेतेपदी सिद्धेश्वर वाघूळदे, उपगटनेतेपदी सूरज गाजरे यांची निवड

0
162

सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ऐतिहासिक फैजपूर नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर शहराच्या राजकारणात भाजपने सत्ताधारी गट स्थापन करत नवे नेतृत्व पुढे आणले आहे. भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा दामिनी सराफ यांच्यासह भाजपचे नऊ नगरसेवक आणि त्यांना पाठिंबा देणारे तीन अपक्ष नगरसेवक यांच्या बळावर सत्ताधारी गट स्थापन झाला असून, या गटाच्या नेतृत्वाची घोषणा करण्यात आली आहे.

सत्ताधारी भाजप गटाच्या गटनेतेपदी प्रभाग क्रमांक १०-अ मधून बिनविरोध निवडून आलेले भाजप प्रज्ञावंत आघाडीचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक सिद्धेश्वर लीलाधर वाघूळदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे उपगटनेतेपदी प्रभाग क्रमांक ९-अ चे नगरसेवक सूरज रमेश गाजरे यांची निवड करण्यात आली आहे. दोन्ही निवडींना उपस्थित सर्व नगरसेवकांनी एकमताने पाठिंबा दिला.

नगरपरिषदेत अनेक वर्षांनंतर नवख्या व तरुण पिढीच्या हाती गटनेतेपदाची जबाबदारी देण्यात आल्याने भाजप आमदार अमोल जावळे यांच्या ‘नव्या दिशा, नव्या आशा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष मूर्त स्वरूप मिळाल्याचे बोलले जात आहे. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर तरुणांचे सशक्तीकरण होण्यास चालना मिळाली असून, फैजपूर शहरासह भाजप-शिवसेना युतीच्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या निवडीच्या वेळी भाजप राज्य परिषद सदस्य हिरालाल चौधरी, नगराध्यक्षा दामिनी सराफ, नगरसेवक सागर होले, महेंद्र मंडवाले, नगरसेविका नीलिमा महाजन, निकिता कोळी, दिपाली भारंबे, जयश्री चौधरी, सुनीता नेहेते, अमिता चौधरी, भावना भारंबे यांच्यासह विनोद चौधरी, पवन सराफ, प्रकाश कोळी, अनंता नेहेते, हेमराज चौधरी, राजेश महाजन, नरेंद्र चौधरी, संदीप भारंबे उपस्थित होते. तसेच फैजपूर मंडळ अध्यक्ष उमेश बेंडाळे, मंडळ सरचिटणीस पिंटू तेली, कार्यकर्ते भूषण गलवाडे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते.

नवनियुक्त गटनेते सिद्धेश्वर वाघूळदे आणि उपगटनेते सूरज गाजरे यांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहराचा सर्वांगीण विकास, नागरी समस्या सोडवणे आणि नगरपरिषदेत पारदर्शक कारभार राबवण्यासाठी दोन्ही नवे पदाधिकारी प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

एकूणच फैजपूर नगरपरिषदेत भाजपने तरुण नेतृत्वावर विश्वास दाखवत सत्ताधारी गटाची धुरा नव्या पिढीकडे सोपवली असून, या निर्णयामुळे आगामी काळात शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound