जामनेर – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘तालुक्यातील नेरी दिगर गावांमधील जुने हिंगणे रोडवरील जिनिंग प्रेससमोर असलेल्या वीट भट्टीमुळे नागरिक व शेजारी असलेल्या शाळा यांना मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाचा धोका होत असून ही वीटभट्टी तात्काळ बंद करण्यात यावी.’ या मागणीचे निवेदन संभाजी बिग्रेडतर्फे तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष राम अपार, तालुका उपाध्यक्ष संतोष कुमावत, किरण पाटील, उमेश कचरे, महेश कचरे, गणेश माळी, विशाल पाटील, जितेंद्र पाटील, सतिष बिराडे, छोटू सोनवणे, निलेश खरे, सतीश कुमावत, विजय बाविस्कर, भूषण जंजाळे आदी उपस्थित होते.
नेरी दिगर गावाशेजारी असलेल्या ग्रामपंचायतच्या जागेवर एकाने वीट भट्टी टाकली आहे. या वीट भट्टीच्या आजूबाजूला नागरिकांचा रहिवास असून याठिकाणी जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नेरी दूरक्षेत्र पोलीस चौकीसमोर शासकीय दवाखाना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिनिंग प्रेस आहे या वीट भट्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होत असून अनेक प्रकारचे आजार जडत आहे. या वीरभट्टी बाबत वेळोवेळी ग्रामस्थांनी लेखी तक्रार दिलेल्या असतानासुद्धा कोणी या वीट भट्टी मालकावर कारवाई करत नाही त्याचबरोबर ग्रामस्थ या वीट भट्टी मालकांकडे समजवण्यासाठी गेले असता ते त्यांना आरे कारेची भाषा वापरतात. त्यामुळे आता ग्रामस्थांना न्याय कोण देणार ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे वीटभट्टी मालक दबंगगिरी चालू असल्यामुळे गावातील ग्रामसेवक व इतर अधिकारी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. त्यामुळे आपण आपल्या स्तरावर तात्काळ कारवाई करून वीटभट्टी बंद करावी. जर असे झाले नाही तर आम्ही ग्रामस्थ व संभाजी बिग्रेड यांच्या माध्यमातून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याबाबतचे लेखी निवेदन देण्यात आले.
वीट भट्टी बंद करण्याबाबत संभाजी बिग्रेड व नेरी दिगर ग्रामस्थांनी निवेदन दिल्यानंतर लगेच तहसीलदार अरुण शेवाळे यांनी तात्काळ दखल घेऊन गट विकास अधिकारी यांना भ्रमणध्वनी करून सदर प्रकरणाची चौकशी करावी व जर वीट भट्टी ही ग्रामपंचायतच्या अतिक्रमण जागेवर असेल तर तात्काळ ग्रामसेवक व मंडळ अधिकारी यांनी या वीटभट्टीवर कारवाई करावी. जर त्यांनी कारवाई केली नाही तर ग्रामसेवक व विस्तार अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करा असा आदेश गट विकास अधिकारी यांनी दिला आहे.