मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळा भुवैकूंठ पंढरीत दुपारी 3 वाजता वारकरी मेळ्यासह दाखल होताच आईसाहेब मुक्ताई पादुकांना चंद्रभागा स्नान घालण्यात आले. विशेष म्हणजे आईसाहेब मुक्ताई पादुकांना स्नान घालण्यास सुरुवात करताच पाऊसाला सुरुवात झाली. भर पावसात चंद्रभागा स्नान झाले म्हणजेच वरुण राजाने आपली हजेरी लावून आईसाहेब मुक्ताईंचे श्रीक्षेत्र पंढरपूरात स्वागत केले. वारकरी भाविकांनीही पहीले चंद्रभागा स्नान केले व चंद्रभागा आरती केली. यावेळी ॲड. रविंद्र भैय्यासाहेब पाटील, अध्यक्ष मुक्ताई संस्थान,ह.भ.प.रविंद्र महाराज हरणे, पालखी सोहळा प्रमुख, सम्राट पाटील, ज्ञानेश्वर हरणे, सर्व वारकरी व भाविक उपस्थित होते.
चंद्रभागा स्नान झाल्यानंतर पालखी सोहळा जुने दगडी पुलावरून भुवैकूठ पंढरपूर येथे मिरवणूकीने दत्त घाटावरील मुक्ताई मठात दाखल झाला. तेथे आईसाहेब मुक्ताईंच्या पालखीची आरती करण्यात आली व अशाप्रकारे आईसाहेब मुक्ताईंचा पालखी सोहळा दत्त घाटावरील मुक्ताई मठात श्रीक्षेत्र पंढरपूरात विसावला. आषाढी पौर्णिमेपर्यंत पालखी सोहळ्याचा मुक्काम मुक्ताई मठ श्रीक्षेत्र पंढरपूर येथे असतो. १६ जुलैला वाखरी येथे संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपान, संत मुक्ताई, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम सकळ संतांचा पालखी भेट सोहळा होईल.