जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथील गणेशवाडी परिसरात सुरु असलेल्या श्रीमद भागवत कथेत शनिवारी भगवान श्रीकृष्ण-रुख्मिणी विवाह सोहळा उत्साहात भाविकांनी साजरा केला. यावेळी विविध गीतांवर भाविकांनी जल्लोष करीत प्रभूचा जयघोष केला. दिवसा हभप देवदत्त मोरदे महाराज यांनी कथा सांगितल्यावर रात्री शेलवड येथील हभप सूर्यभाननंदजी महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.
अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्र मंदिर स्थापनेच्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त जळगाव शहरातील गणेशवाडी भागामध्ये श्रीदत्त मंदिर परिसरात महापालिकेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती मंगला चौधरी व विठोबा चौधरी यांच्यातर्फे संगीतमय भव्य दिव्य श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या सहाव्या दिवशी हभप देवदत्त मोरदे महाराज यांनी कृष्ण विवाहाची कथा आणि कृष्णचरित्र कथा सुश्राव्य केली. सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण यांच्या चरित्राविषयी आणि तत्वज्ञान याबाबत हभप मोरदे महाराज यांनी भाविकांना माहीती दिली. त्यानंतर श्रीकृष्ण विवाहसोहळ्याचा सजीव देखावा सादर करण्यात आला.
श्रीकृष्ण विवाह पार पडल्यावर भाविकांनी विविध गीतांवर आणि भजनांवर ठेका धरून आनंद साजरा केला. यावेळी इंदुबाई सूर्यवंशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महाआरती राधेशाम पांडे, अनिल भोळे, डिगंबर चौधरी, बापू मराठे, मनोज पाटील, आप्पा डाबोरे, नरेंद्र चांदसरे, प्रविण देशमुख, पांडुरंग महाले यांच्या हस्ते करण्यात आली. रात्री शेलवड येथील हभप सुर्यभाननंदजी महाराज यांचे कीर्तन रात्री झाले. भक्तीच्या वातावरणात वाढलेला माणूस भक्त होतो. भक्तीचा सोपा मार्ग म्हणजे नाम संकीर्तन. भगवंताची मनापासून उपासना, सेवा केल्यास भगवंत आपले दुखः दूर करण्याची शक्ती देतात, असे प्रतिपादन सुर्यभाननंदजी महाराज यांनी केले.