Home आरोग्य “श्री गणेशा आरोग्याचा” उपक्रम उत्साहात ; ६ हजार नागरिकांची तपासणी 

“श्री गणेशा आरोग्याचा” उपक्रम उत्साहात ; ६ हजार नागरिकांची तपासणी 

0
161

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरात विश्व हिंदू परिषद जिल्हा सेवा विभागाच्या पुढाकाराने “श्री गणेशा आरोग्याचा” आरोग्य अभियान २०२५ नुकतेच मोठ्या यशस्वीतेने पार पडले. मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त सहकार्याने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, शेकडो गरजूंना मोफत वैद्यकीय तपासणी व पुढील उपचारासाठी शासकीय मदतीचा लाभ मिळणार आहे.

आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने विश्व हिंदू परिषद जिल्हा सेवा प्रमुख डॉ. हितेंद्र युवराज गायकवाड, सहसेवा प्रमुख दीपक भाऊ दाभाडे आणि जिल्हा सहमंत्री राजूभाऊ गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध सेवा वस्त्यांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. हे शिबिरे नवनाथ मित्र मंडळ (हरी विठ्ठल नगर), उज्वल सांस्कृतिक क्रीडा मंडळ (कांचन नगर), जाणता राजा मंडळ (शाहूनगर), अनमोल मजदूर मंडळ (तुकाराम वाडी), जय हो मित्र मंडळ (कौतिक नगर – अयोध्या नगर), आणि स्वामी विवेकानंद मित्र मंडळ (कंजरवाडा) या सहा ठिकाणी घेण्यात आली.

या सर्व शिबिरांमध्ये मिळून सुमारे ६००० नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासलेल्या रुग्णांपैकी सुमारे ३०० रुग्णांना डोळ्यांचे ऑपरेशन, सांधे प्रत्यारोपण, हृदयविकार, मणक्याचे आजार यांसाठी शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांना मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मदाय रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती राजूभाऊ गांगुर्डे यांनी दिली.

या अभियानात गोल्ड सिटी हॉस्पिटल, विश्व प्रभा हॉस्पिटल, शासकीय होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि धर्मदाय रुग्णालय यांनी आरोग्य तपासणी व पुढील उपचारासाठी सहकार्य केले. तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख डॉ. सिद्धार्थ चौधरी, समाजसेवा अधीक्षक डॉ. तुषार सावरकर आणि विभाग समन्वयक डॉ. अजित विसपुते यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

या अभियानाच्या यशस्वी आयोजनात सहभागी झालेल्या सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी, स्वयंसेवक, वैद्यकीय अधिकारी आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचे आभार विश्व हिंदू परिषद जिल्हा सेवाप्रमुख डॉ. हितेंद्र युवराज गायकवाड आणि सहसेवा प्रमुख दीपक भाऊ दाभाडे यांनी व्यक्त केले.


Protected Content

Play sound