पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि मदत कार्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेले श्री दत्तलिला बहुउद्देशीय संस्थेचे संचालक दिलीप मुरलीधर मालपुरे यांनी तरवाडे येथील समर्पण गोशाळेत मदतीचा हात दिला. त्यांनी पशुखाद्य, सरकी ढेप आणि गोमाता यांच्या औषध उपचारासाठी रोख रक्कम देऊन महत्त्वपूर्ण योगदान दिले.
आजकाल लोक आपला वाढदिवस मोठ्या प्रमाणात केक कापून, फटाके फोडून साजरा करतात. अनेकजण विविध प्रकारचे प्राणी आपल्या घरात पाळतात, परंतु गोमाताचे संगोपन करण्यास कोणी तयार होत नाही. अनेक शहरांत आणि गावां-गावांत गोमाता मोकाट फिरताना दिसतात. मात्र, समर्पण गोशाळेत तीनशे ते चारशेहून अधिक गोमातांचे पालन-पोषण आणि संगोपन केले जाते, असे ह.भ.प. रविदास महाराज यांनी सांगितले. आजही त्यांच्या गोशाळेत दर महिन्याला चार-पाच गोमाता आणि नव्याने जन्मलेले बछडे येत असतात.
या जनजागृतीच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी श्री दत्तलिला बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सभासद एकत्रीकरण करून प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी आपले वाढदिवस, स्मृतीदिन, पुण्यस्मरण दिन अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, मुकबधीर शाळा, शिक्षणाची आवड असलेले गोरगरीब विद्यार्थी आणि गोशाळा येथे मदत करावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विजय नावरकर यांनी केले.
या आवाहनाला प्रतिसाद देत दिलीप मालपुरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करता गोशाळेला पशुखाद्य, तीन पोते सरकी ढेप आणि अकराशे रुपयांची रोख रक्कम देऊन मदत केली. यावेळी लाडशाखीय वाणी समाज मंडळाच्या अध्यक्षपदी विजय नावरकर यांची निवड झाल्याबद्दल आणि दिलीप मालपुरे यांनी केलेल्या मदत कार्याबद्दल गोशाळेचे अध्यक्ष रविदास महाराज यांनी दोघांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी ला. शा. वाणी समाज मंडळाचे उपाध्यक्ष हेमकांत मुसळे, सचिव महेंद्र कोतकर, संचालक रवींद्र शेंडे, दीपक पिंगळे, प्रशांत येवले, विकास चौधरी आदी उपस्थित होते.