अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील काही गावांमध्ये सध्या वॉटरकप स्पर्धेची लगबग सुरू आहे. ज्या गावांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. तेथे लोकसहभागातून कामं सुरु आहेत. सामाजिक भान जपत प्रत्येक नागरिक आपले योगदान देत आहे. दहिवद गाव येथे अशीच सामाजिक बांधिलकी जपत हळदीच्या कपड्यांवर थेट वर-वधू श्रमदानाला पोहोचल्यामुळे गावकऱ्यांच्या श्रमदानाला आणखी उत्साह आला होता.
दहिवद गाव हे अमळनेर तालुक्यात पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत सध्या अग्रगण्य असणाऱ्या गावांमध्ये आहे. या गावाला नुकतेच मशीनद्वारे काम करण्यासाठी स्नेहालय या सामाजिक संस्थेकडून १ लाख रूपये मिळणार आहेत. दहिवद ग्राम पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संजीव सैंदाणे यांनी ही माहिती दिली आहे. दहिवद गावाला पुणे, मुंबई येथील माजी विद्यार्थ्यांकडून देणग्यांचा ओघ सुरूच असल्याने, कामाला आणखी उत्साह आला आहे. ९० बाय, ४५ मीटर महाकाय तलाव नव्याने खोदला जात आहे, त्याचं काम पूर्ण झालं आहे. विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीने दहिवद गावाला अजून मदत किंवा भेट दिलेली नाही. राजकारण विरहित काम होत असल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान, यावेळी लोकनियुक्त सरपंच सुषमा वासुदेव पाटील या देखील उपस्थित होत्या. वर- बीटेकचे शिक्षण घेतलेले दिनेश माळी हे दहिवदच्या हिंमतराव चिंधू माळी यांचे पुतणे आहेत. तर वधूचे शिक्षण एमएस्सीपर्यंत झाले आहे. त्या बाभळेनाग ता. पारोळा येथील दिलीप संतोष महाजन यांच्या कन्या आहेत.