जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकाशवाणी चौक आणि गणेश कॉलनी स्टॉप येथे मागील २४ तासात झालेल्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश भोळे यांनी तातडीची आज बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आणि अपघात रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले.
स्पीड ब्रेकर आणि सर्कल दुरुस्तीचे आदेश
या बैठकीत बांभोरी पूल ते टीव्ही टॉवर दरम्यान ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच, आकाशवाणी आणि अजिंठा चौफुली वरील सर्कल तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले.
अवैध बॅनरवर कारवाईचे स्पष्ट आदेश
बैठकीत विना परवानगी लावण्यात आलेल्या बॅनरवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले. यावेळी आमदार भोळे म्हणाले, “माझेही बेकायदा बॅनर लावले असतील तर ते काढा.”
अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा –
बैठकीत अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेवर संताप व्यक्त करत आमदार भोळे म्हणाले, “लोकं मेल्यावरच आपण बैठका घ्यायच्या का?” अधिकाऱ्यांनी अपघात रोखण्यासाठी तत्काळ जबाबदारी घेण्याचा आणि प्रभावी उपाययोजना राबवण्याचा इशारा त्यांनी दिला. जळगावातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने गंभीर आणि जलदगतीने निर्णय घ्यावा, अन्यथा यावर अधिक कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश आमदार सुरेश भोळे यांनी दिला.