रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरासह परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना विशेषतः गृहिणींना स्वयंपाकासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक गॅस एजन्सींवर घरगुती सिलिंडरचा साठा संपल्याचे चित्र दिसत असून हजारो ग्राहकांची बुकिंग प्रलंबित आहेत. मात्र दुसरीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरचा साठा उपलब्ध असल्याने हॉटेल आणि खाद्य व्यवसायिकांना काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर शहरातील भारत गॅस एजन्सीवर सध्या घरगुती गॅस सिलिंडरचा स्टॉक पूर्णपणे संपला आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांना बुकिंग करूनही सिलिंडर मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सध्या सुमारे 2500 ग्राहकांनी आगाऊ बुकिंग केले असून कंपनीकडून गॅसचा पुरवठा झाल्यानंतरच त्यांना सिलिंडर उपलब्ध होणार असल्याची माहिती एजन्सी व्यवस्थापनाने दिली आहे.

एजन्सीकडून सांगण्यात आले की, पुढील पाच दिवसांच्या आत कंपनीकडून गॅसचा पुरवठा होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर प्रलंबित असलेल्या सर्व बुकिंगधारकांना टप्प्याटप्प्याने गॅस सिलिंडर वितरित करण्यात येतील. दरम्यान, घरगुती गॅसचा तुटवडा असल्याने अनेक गृहिणींना स्वयंपाकासाठी पर्यायी उपाय शोधावे लागत असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
दुसरीकडे व्यावसायिक म्हणजेच कमर्शियल गॅस सिलिंडरचा सुमारे 100 हंडींचा साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हॉटेल आणि खाद्य व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना सध्या गॅसपुरवठ्याबाबत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत नसल्याचे दिसत आहे.
घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा कृत्रिमरीत्या निर्माण होऊ नये आणि साठेबाजीसारखे प्रकार घडू नयेत यासाठी प्रशासनानेही सतर्कता दाखवली आहे. काल तहसीलदार दिपा जेढे यांनी रावेर शहरातील विविध गॅस एजन्सींना भेट देत गॅस साठ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. एजन्सींवरील परिस्थितीची माहिती घेत नागरिकांना वेळेवर गॅस उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या.
याशिवाय आज तालुका पुरवठा अधिकारी विवेक शिरेकर यांनीही गॅस एजन्सींना भेट देत साठ्याची माहिती घेतली. गॅस सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून साठेबाजी करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन किंवा साठेबाजी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, पुढील काही दिवसांत कंपनीकडून पुरवठा सुरळीत झाल्यानंतर घरगुती गॅस सिलिंडरची समस्या कमी होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र तोपर्यंत अनेक कुटुंबांना गॅसच्या प्रतीक्षेत राहावे लागणार असल्याने नागरिकांना काही दिवस अडचणी सहन कराव्या लागणार आहेत.



